संघर्षनामा वृतसेवा ।श्रीगोंदा
दि .६ फेबुवारी २०२६
प्रतिनिधी
पोलिस भरतीचे स्वप्न दाखवत एका तरुणीवर तिच्याच प्रशिक्षकाने वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर आणि संतापजनक प्रकार श्रीगोंद्यात उघडकीस आला आहे. संबंधित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिचा जबरदस्तीने गर्भपात करून, तक्रार केल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला आहे.
जावेद शेख (रा. जकातेनगर, श्रीगोंदा) असे आरोपीचे नाव असून, त्याची शहरात पोलिस व सैन्य भरतीसाठी प्रशिक्षण देणारी खासगी अकॅडमी आहे. पीडित तरुणी ही याच अकॅडमीत पोलिस भरतीसाठी सराव करत होती.
फिर्यादीनुसार, डिसेंबर २०२४ मध्ये प्रशिक्षणादरम्यान तरुणीच्या पायाला दुखापत झाली होती. उपचाराबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी तिने प्रशिक्षक जावेद शेख याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर शेख याने तिला पहाटेच्या सुमारास प्रशिक्षण देण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलात बोलावले. दुसऱ्या दिवशी पहाटे तरुणी तेथे गेली असता, आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.
या घटनेची कुणालाही वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी आरोपीने तरुणीला दिली. त्यानंतर त्याने तिच्यावर अनेक वेळा अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे. या अत्याचारातून तरुणी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने तिचा गर्भपात करून घेतल्याचेही समोर आले आहे.
नंतर तरुणीने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली असता, त्याने टाळाटाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अखेर मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून पीडित तरुणीने श्रीगोंदा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
दरम्यान, या घटनेची माहिती समजताच शहरातील विविध सामाजिक, युवक व महिला संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी करत संघटनांच्या वतीने श्रीगोंदा पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत असून, फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.